मुंबई - कुर्ला येथे बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात 49 जण जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बसचा हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करणारा आहे. अपघाताबाबत दोषींवर कारवाई करावी तसेच बेस्टच्या कंत्राटी बसबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. या पत्रात 9 डिसेंबर 2024 रोजी कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या सात नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. 49 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा असा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. आणि बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे असे शिंदे म्हणाले.
आजमितीस बेस्ट ताफ्यातील 3000 बेस्ट बसेसपैकी 2000 बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसचा पुरवठा करणारा कंत्राटदारच सदर बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की कंत्राटदाराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात. त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करून सदर घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असा इशारा शिंदे यांनी पत्राद्वारे दिला आहे.
कालच्या बेस्ट अपघातात बेस्ट चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आपण तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा; तसेच जखमी नागरिकांना रुपये 50 हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करित आहोत.
बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष 2018 ते 2021 या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने सदर पस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांनी याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा आणी मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना तातडीने मदत करावी तसेच दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment