मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day) अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी (Chaityabhumi), छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अधिकाधिक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सोबतच जलप्रतिबंधक निवासी मंडप तसेच पायवाटांवर धूळ प्रतिबंधात्मक आच्छादनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातील कानाकोपऱ्यातून मुंबईत मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सेवासुविधांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित विषयांमध्ये सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसारच स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमतानाच नियमित स्वच्छतेसाठी अधिकाधिक भर देण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे अनुयायांच्या सुविधेकरिता स्वच्छतेला प्राधान्य देत अतिरिक्त मनुष्यबळ प्रत्येक सत्रामध्ये नेमण्यात आले आहे. तसेच शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी दिली.
रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२० कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्वच्छतेसाठी प्रत्येक सत्रामध्ये २२५ कामगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा महिला अनुयायांच्या सुविधेसाठी पिंक टॉयलेटची व्यवस्था ४ ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच माता आणि बालकांच्या सुविधेसाठी ४ हिरकणी कक्षांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अनुयायांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने आरओ प्लांटची व्यवस्था सहा ठिकाणी करण्यात आली आहे. त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे ५३० नळ, पाण्याचे ७० टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समवेत स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची बाटली आणि बिस्किटेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रांगेेत आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या अनुषंगाने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सीसीसीटीव्ही कॅमेरा, फिरते कॅमेरा आणि मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर यासारख्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष आणि निरीक्षण मनोऱ्यांची उभारणीही करण्यात आली आहे. तसेच २ अग्निशमन वाहने, अतिदक्षता रूग्णवाहिका, ४ बोटी आदींची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी, दादर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
* चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही. आय. पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था. नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
* १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
* पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था.
* संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.
* अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
* चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहीत बोटींची संपूर्ण परिसरात व्य्वस्था.
* चैत्यीभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
* फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब या समाजमाध्यमांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे दिनांक ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपण.
* विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्स.
* राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
* स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवास.
* मैदानात धूळ रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादन.
* अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुगे.
* मोबाइल चार्जिंगकरीता छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे पॉइंट.
* फायबरची तात्पुरत्या स्नानगृहे व तात्पुरत्या शौचालये.
* रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व बसण्यासाठी बाकडे.
* स्नानगृहे व पिण्याचे पाणी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल इत्यादींद्वारे देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यानिमित्ताने केले आहे.
No comments:
Post a Comment