कर्जत/रायगड - एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने हल्लीच चालक वाहकांच्या रजा व त्यांच्या कामगिरी बद्दल परिपत्रक काढून त्यात काही चांगल्या मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत ,पण दोन आठवडे झाले तरी आजही त्याची बहुतांशी आगारात अंमलबजावणी झालेली नाही. कामगिरी लावण्यात पक्षपातीपणा केला जातो. आजही चालक वाहकांना किंवा कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी रजा दिली जात नाही.रजेसाठी त्यांना पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांकडे ताटकळत उभे राहावे लागते, स्थानिक पातळीवर या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली जात असून परिपत्रकाची नीट अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
ते आज कर्जत येथील जय अंबे भवानी शाळेच्या, सभागृहात झालेल्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, रजा मंजूर करण्याची पद्धत व चालक, वाहक कामगिरी कुणी लावावी या बाबतच्या चांगल्या मार्गदर्शक सूचना वाहतूक विभागाने या नवीन परिपत्रकात प्रसारित केल्या आहेत.पण काही आगारात अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.हे दुर्दैवी असून चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी हे महामंडळाचे मुख्य घटक आहेत.ते समाधानी असतील तरच व्यवस्थापनाने घालून दिलेल्या नवीन पंचसूत्रीची चांगली अंमलबजावणी होईल.म्हणून पंचसूत्रीची यशस्वी अंमलबजावणी व्हावी असे वाटत असेल तर चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांना सन्मानाने वागवले पाहिजे, पण ते स्थानिक पातळीवर अजूनही होताना दिसत नाही.असेही बरगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
काही विभागात व काही आगारात अधिकारी आणि पर्यवेक्षक हे एसटीचा मुख्य घटक असलेल्या चालक, वाहकांना काही शंका असल्यास किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळी अधिकाऱ्यांची भेट मागितल्यास केबिन बाहेर ताटकळत उभे ठेवतात. हे गैर असून या उलट एसटीत वरिष्ठ पातळीवर मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात मात्र महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किंवा सर्व विभागांचे महाव्यवस्थापक कुठल्याही कर्मचाऱ्याला अगदी सहजपणे भेटत असतात.त्यांच्या शंकांचे निरसन करीत असतात. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी चिठ्ठी देण्याची पद्धत मध्यवर्ती कार्यालयात बंद करण्यात आली आहे.ही बाब खरोखरच चांगली व कौतुकास्पद आहे.आणि म्हणून एसटीत पंचसूत्री खरोखरच यशस्वी करायची असेल तर कर्मचाऱ्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवणाऱ्या आगार तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांना मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून समज दिली पाहिजे असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
या वेळी पेण, रामवाडी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातील लिपिक संभाजी मोरे यांचा ते एसटीच्या सेवेतून निवृत्त होत असल्याने स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीला काँग्रेसचे स्थानिक नेते मुकेश सुर्वे, अलिबाग आगारातील राजा म्हात्रे, कर्जत आगारातील शशिकांत शिंदे, परमेश्वर डोंगरे, कमलाकर किरडे, पेण आगारातील महादेव दहिफळे, अतुल पाटील, एम. आर. पठाण, रामवाडी विभागीय कार्यालयातील प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment