
मुंबई - इयत्ता १० वी आणि १२ वी परिक्षांना बुरखा परिधान करुन येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर रोखण्यात यावे अशी मागणी राज्याचे मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. सदर मागणी मुस्लीम समुदायाला लक्ष्य करणारी तसेच कॉपीमुक्तीच्या आडून मुस्लीम समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. तसेच ही मागणी फेटाळण्यात यावी अशी विनंती आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
यासदंर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुस्लिमांसाठी बुरखा किंवा डोक्यावरचा स्कार्फ घालणे एक उपासना आहे. संविधानाच्या उद्देशिकेत व्यक्तीला श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. संविधानाच्या कलम १५ मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई आहे. परीक्षेच्या नियमांच्या नावाखाली शाळांमध्ये बुरखा किंवा डोक्यावरचा स्कार्फ बंदी घालण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी हा धर्मात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र हे केवळ मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी लिहिले आहे. कॉपीमुक्ती आडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा यामागे कुटील डाव दिसून येतो. मंत्री राणे यांची मागणी मान्य केल्यास शिक्षण क्षेत्रात ध्रुवीकरण वाढू शकते, अशी भीती आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. शेख यांनी सदर पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही पाठवले आहे.
महायुती सरकार एकीकडे महिलांच्या उन्नतीकरिता ‘लाकडी बहीण’ योजना आणल्याचे सांगते. ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ असा नारा देते. ते सरकार दुसरीकडे बुरखा परिधान केला म्हणून बेटीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची कशी काय मागणी करु शकते. सरकारातील मंत्री हे महिलांविरोधात व्देषपूर्ण वातावरण निर्माण होईल, अशी मागणी कशी काय करतात, असे सवाल आमदार रईस शेख यांनी मंत्री नितेश राणे यांच्या पत्रासदंर्भात उपस्थित केले आहेत.
महायुती सरकारने बुरखाबंदीसारख्या द्वेषपूर्ण मागण्यांना मान्यता दिली तर लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आणण्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा आमदार रईस शेख यांनी दिला आहे. विद्यार्थ्यी आणि त्यांच्या पालकांनी मंत्री राणे यांच्या मागणीला घाबरू नये. येणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आमदार रईस शेख यांनी १० वी आणि १२ वीच्या परिक्षार्थींना केले आहे.
No comments:
Post a Comment