
मुंबई - महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये दिनांक १६.८.२०२४ रोजी २३६ अग्निशामक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु सदर कर्मचाऱ्यांना महापालिका अग्निशमन दल प्रशासनाचा गलथानपणा, प्रशासकीय उदासीनता यामुळे ऑगस्ट २०२४ पासून वेतनापासून तसेच प्रशिक्षण कालावधीतील प्रशिक्षण भत्त्यापासून वंचित राहावे लागले असल्याची माहिती मुंबई फायर सर्व्हिस युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.
या नवनियुक्त अग्निशामक कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, गरीब घरातून अनेक मुले/मुली भरती झाल्या असून, सध्या त्यांनी तात्पुरता नातेवाईकांकडे आसरा घेतला असून, वेतन न मिळाल्यामुळे खायचे काय, आणि प्रवास कसा करायचा, हे प्रश्न रोज त्यांच्यासमोर यक्ष म्हणून उभे असतात. कित्येक मुले /मुली त्यामुळे कर्जाच्या विळख्यात सापडण्याचा संभव आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता या कर्मचाऱ्यांसह महापालिकेत नव्याने नियुक्त झालेले अनेक कामगार, कर्मचारी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरिता त्यांच्या कायदेशीर वेतनापासून वंचित असल्याचे कळते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरलेला आहे.
महापालिका अग्निशमन दल प्रशासनाची उपरोक्त उदासीन कृती ही महापालिकेला लागू असलेल्या विविध कामगार कायद्याच्या तरतुदींचा भंग तर आहेच, त्याशिवाय फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल अशी कृती आहे. संबंधित सर्व नवनियुक्त अग्निशामकांना त्यांच्या कायदेशीर वेतनाचे तसेच प्रशिक्षण भत्त्याचे अधिदान थकबाकीसह माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतनाबरोबर करण्यात यावे, अशी विनंती महापालिका उप आयुक्त (वित्त) व प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना करण्यात आली असल्याचे रमाकांत बने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment