कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर सरकविण्‍याची कार्यवाही पूर्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2025

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर सरकविण्‍याची कार्यवाही पूर्ण



मुंबई - मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला ५५० मेट्रिक टन वजनी उत्‍तर बाजूचा गर्डर रेल्‍वे भागात सरकविण्‍याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. 

मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०१.३० ते मध्‍यरात्री ४.०० या अडीच तासांच्‍या कालावधीत वाहतूक व वीज पुरवठा या दोन्‍ही घटकांमध्‍ये घेतलेल्या विशेष ब्‍लॉक दरम्‍यान गर्डर सरकविण्‍याची आव्‍हानात्‍मक कार्यवाही पूर्ण करण्‍यात आली. 

रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी गर्डर सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास १२ मीटर अंतर शिल्‍लक असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. मात्र, महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करत गर्डर सरकविण्याचे काम आज (दिनांक ३१ जानेवारी २०२५) पूर्ण केले आहे. 

गर्डर सरकविण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी विशेष तज्ञ मे राईट्स यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने विशेष ब्‍लॉक घेऊन तुळई सरकविण्‍याची कार्यवाही पूर्णत्‍वास नेण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेला विशेष सहकार्य केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून ही कामगिरी केली आहे. आता, मध्‍य रेल्‍वेच्‍या 'ब्‍लॉक' नंतर लोखंडी गर्डर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाचा उत्‍तर बाजूचा लोखंडी गर्डर महानगरपालिका हद्दीत ९.३० मीटरपर्यंत चाचणी स्‍वरूपात सरकविण्‍याची कार्यवाही मंगळवार, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर, मध्‍य रेल्‍वे प्रशासनाच्‍या शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मध्‍यरात्री ११.३० ते रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० या ब्‍लॉक दरम्‍यान सदर गर्डर ५८ मीटर सरकविण्‍यात आला. दरम्यान, गर्डर सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास १२ मीटर अंतर बाकी असताना तांत्रिक अडचणी आल्‍याने या कार्यवाहीमध्ये व्यत्यय आला. तथापि, त्‍यावर मात करत अखेर गर्डर सरकविण्‍याची कार्यवाही आज दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्‍यात महानगरपालिका प्रशासनाने यश मिळविले आहे.

 मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. आता, मध्‍य रेल्‍वेने 'ब्‍लॉक' घेतल्‍यानंतर लोखंडी तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. रेल्‍वे मार्गावर गर्डर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महानगरपालिकेच्‍या पूल विभागामार्फत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोच मार्ग (ऍप्रोच रोड) साठी खांब पाया बांधणी (पाईल फौंडेशन) पूर्ण करणे, पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि भार चाचणी (लोड टेस्‍ट) करणे आदी कामांचे वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर ऍण्‍टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्‍याकामी होणारा कालापव्‍यय टाळण्‍यासाठी ही कामे देखील समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad