प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी रद्द - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी रद्द

Share This

मुंबई - २६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सकाळी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र येथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना सुटी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावे लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. २६ जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असे पत्रकात म्हटले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages