मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2025

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई - राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए या संस्था मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनमध्ये शासनाला सर्वोतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरवर्षी साधारण एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थाच्या माध्यमातून राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी नक्कीच मोलाचे सहकार्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन शासनाने हाती घेतलेल्या या मिशनला २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, शालेय शिक्षण या विविध विभागांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या मिशनची राज्यातील यशस्विता पाहून राष्ट्रीय अंध निवारण कार्यक्रम व धर्मादाय रूग्णालयांचे सहकार्य लाभत आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येत आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालये मिळून साधारण ३५० ऑपरेशन थिएटर येथे दररोज किमान दहा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने हे मिशन सुरू झाल्यापासून २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत साधारण साडेसतरा लाख व २०२२-२३ यावर्षात साधारण नऊ लाख मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे मार्च, २०२४ अखेर पर्यंत नऊ लाख ४५ हजार ७३३ मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मे देखील देण्यात आले आहेत. या मिशनमुळे राज्यातील मोतीबिंदू रूग्णांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होत असल्याचे समाधान ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

शासनाचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन हे ध्येय २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी विदर्भातील मास्टेक आणि शंकरा फाऊंडेशन यांनी दरवर्षाला महाराष्ट्रामध्ये मोफत एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि त्यासोबतच इतर आर्थिक मदत ही देण्याचे मान्य केले आहे. यांच्यासोबत दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा, लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. महात्मे आय हॉस्पीटल, नागपूर, एआयआयएमएस, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, आयजीएमसी, नागपूर, सुरज आय इन्सस्टीट्युट आणि डॉ. नानगिया आय हॉस्पीटल, नागपूर यासारख्या इतरही वैद्यकीय क्षेत्रातील संस्था मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रदान करण्यासाठी सहभागी असतील. या संस्था ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचं निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, या विश्वासाने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन म्हणून कायम या संस्थांना सहकार्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad