ट्रॉमा केअर रूग्णालयातील रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करा - डॉ. विपिन शर्मा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ट्रॉमा केअर रूग्णालयातील रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करा - डॉ. विपिन शर्मा

Share This


मुंबई - जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रूग्णालयास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक १३ फेब्रुवारी २०२५) आकस्मिक भेट दिली. रूग्णांसाठीच्या सेवा सुविधा, औषध उपलब्धतता, स्वच्छता, तसेच विविध शासकीय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. विविध विभागांची आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या सज्जतेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. रूग्णालयाच्या दैनंदिन कामकाजामध्ये पुरेसे मनुष्यबळ नेमतानाच नियमित स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश त्यांनी याप्रसंगी डॉ. शर्मा यांनी यावेळी दिले.

रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना डॉ. विपिन शर्मा यांनी याप्रसंगी दिल्या. रूग्णांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने डॉक्टरांची अधिक उपलब्धतता असावी, तसेच नियमितपणे वेळेत रूग्णसेवा उपलब्ध होतील, यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. शवागृह, कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा आणि निर्मिती प्रकल्प आदी ठिकाणीही त्यांनी भेट दिली.

उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, वैद्यकीय अधिक्षक (हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रूग्णालय) डॉ. राजेश सुखदेवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

रूग्णालयातील अपघात विभाग, बाह्यरूग्ण विभाग येथे प्रत्यक्ष भेट देत डॉक्टरांच्या उपलब्धततेची माहिती डॉ. विपिन शर्मा यांनी घेतली. तसेच आपत्कालीन प्रसंगी डॉक्टरांची कार्यतत्परता, डॉक्टरांची उपलब्धता ककायम ठेवण्याबाबतचे निर्देश त्यांनी रूग्णालय प्रशासनाला दिले. तसेच रूग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. रूग्णांसाठीच्या सर्व सोयीसुविधा तातडीने उपलब्ध द्याव्यात. तसेच रूग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या अनुषंगाने पुरेशी औषध उपलब्धतता ठेवावी. वैद्यकीय सुविधेअंतर्गत रूग्णांशी संबंधित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी तत्परतेने करण्यासाठीचे निर्देशही डॉ. शर्मा यांनी दिले. तसेच रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबाबत सक्त निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.

शस्त्रक्रियागृह येत्या ३ ते ४ दिवसांत कार्यान्वित
रूग्णालयातील शस्त्रक्रियागृह येथे नव्याने निर्जंतुकीकरण प्रणाली उभारण्याची कार्यवाही पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे येत्या ३-४ दिवसात शस्त्रक्रियागृह पूर्ण क्षमतेने शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यानच्या कालावधीत शस्त्रक्रिया आणि अपघात विभागातील कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रूग्णालय परिसरातील स्वच्छता पडताळणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. रूग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबत त्यांनी आढावा घेतला. तसेच रूग्णांची वर्दळ असणारे परिसर प्रतीक्षालय, जिने, पायऱया, उद्वाहने याठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, सुसज्जतेची रंगीत तालिम नियमितपणे घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

पश्चिम उपनगरामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीतील तसेच अपघातग्रस्त रूग्णांसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रूग्णालय सर्वात जवळचे रूग्णालय आहे. या रूग्णालयाची स्थापना सन २०१३ मध्ये झाली. येथे एकूण ३०४ रूग्णशय्या आहेत. अतिदक्षता विभागात १० ट्रॉमा मेडिकल आयसीयू उपलब्ध आहेत. तसेच सुसज्ज असा अपघात उपचार विभागदेखील आहे. न्यूरो सर्जरी विभाग, डायलिसिस तसेच रूग्णालयअंतर्गत असणाऱया सर्व महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages