Mumbai News - रेल्वे सेवा पावसाळ्यात सुरळीत राहावी यासाठी गाळ काढण्याची कामे योग्यरितीने करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - रेल्वे सेवा पावसाळ्यात सुरळीत राहावी यासाठी गाळ काढण्याची कामे योग्यरितीने करा

Share This

 

मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेल्‍वेलगतच्‍या नाल्यातून गाळ काढण्याची कामे योग्यरितीने आणि पूर्ण क्षमतेने करावी, जेणेकरुन रेल्‍वे रूळांवर पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. उपनगरीय रेल्वे सारख्या विविध यंत्रणांच्या समन्वयाने नागरिकांना दिलासा मिळेल, रेल्‍वे सेवा पावसाळ्यात बाधित होणार नाही, अशारितीने सर्व कामे चोखपणे पूर्ण करावीत. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्‍या अधिका-यांनी संयुक्त स्थळ पाहणी दौरे करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत

बृहन्मुंबई महानगरपालिका पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महानगरपालिका मुख्‍यालयात आज (दिनांक १७ फेब्रुवारी २०२५) पार पडली. त्‍यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) श्रीधर चौधरी यांच्‍यासह रेल्‍वे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी सखल परिसरांमध्ये रेल्‍वे रूळांवर पाणी साचल्‍याच्‍या घटनांमुळे रेल्‍वे सेवा बाधित होते. त्‍यामुळे प्रवाशांना असुविधेला सामोरे जावे लागते. रेल्‍वे स्‍थानक, रेल्‍वेच्‍या हद्दीत पावसाचे पाणी साचल्‍याच्या घटना कमी व्‍हाव्‍यात यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्‍नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर, मागील काही वर्षात ज्‍या ठिकाणी रेल्‍वे रूळांवर पाणी साचण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत, अशा ठिकाणांचा स्‍थळनिहाय आढावा घेऊन कोणती कार्यवाही केली, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते.

मध्‍य रेल्‍वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्‍वे स्‍थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळक नगर नाला,विद्याविहार रेल्‍वे स्‍थानक (फातिमा नगर), कर्वे नगर नाला (कांजूर मार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्‍वे स्‍थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्‍लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच, पश्चिम रेल्‍वे विभागातील अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्‍यात येणा-या विविध उपाययोजनांची यावेळी विस्‍तृतपणे चर्चा करण्‍यात आली.

महानगरपालिका आयुक्त गगराणी म्‍हणाले की, मुंबई उपनगरीय रेल्वे थांबल्यास मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्यामुळे रेल्‍वे रूळांवर पावसाचे पाणी साचू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनासमवेत सर्वोच्‍च स्‍तरावर समन्‍वय असणे अपेक्षित आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्‍यातच पावसाळा पूर्वतयारी बैठक आयोजित केली आहे. जेणेकरून महानगरपालिका आणि रेल्‍वे विभागास सुसमन्‍वय साधून प्रत्‍यक्ष कार्यवाहीस साडेतीन महिन्‍यांपेक्षा अधिकचा कालावधी मिळू शकेल. विषयाचे गांभीर्य ओळखून स्‍थळनिहाय कार्यवाही सुनिश्चित करावी. रेल्वे परिसरातील कलव्हर्टची स्वच्छता मोहीम संयुक्तपणे पूर्ण करावी. ही कामे विहित वेळेत पूर्ण करून पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल, अशा त-हेने उपाययोजना कराव्यात. जोरदार पावसातही उपनगरीय रेल्वे सेवा विनाव्‍यत्यय सुरू राहिली पाहिजे. त्‍यासाठी नाल्यांमधून गाळ उपसा करण्यासह इतरही कामे योग्यरितीने पार पडली पाहिजेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍‍हणाले की, पावसाळापूर्व सज्जता भाग म्हणून मुंबईत करण्यात येत असलेली नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत. आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावी. ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, नाले परिसरातील रहिवासी भागांत पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. मुंबईत सखल भागात पाणी साचणा-या संभाव्य ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी उदंचन (पंप) व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पंप चालक आणि अभियंत्यांनी हे पंप वेळेत सुरु होतील, याची खबरदारी घ्‍यावी. काही ठिकाणी रेल्‍वे विभागामार्फत कामे सुरू असून ती विहित वेळेत पूर्ण करावीत. या कामांसाठी महानगरपालिका रेल्‍वे विभागास निधी उपलब्‍ध करून देणार असेल तर हा निधी विनाविलंब उपलब्‍ध करून द्यावा, अशी सूचना देखील बांगर यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages