
मुंबई - भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवड करण्यात आली. माकपच्या २४ व्या मुंबई अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात ३१ सदस्यीय जिल्हा समिती निवडण्यात आली. मावळते सचिव डॉ. एस. के. रेगे यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली.
शैलेंद्र कांबळे साधारण १९८५ च्या दरम्यान माजी खासदार कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर, कामगार नेते कॉम्रेड प्रभाकर संझगिरी, कॉम्रेड सुशील वर्मा आणि धारावीतील माजी आमदार कॉम्रेड सत्यंद्र मोरे या कमुनिस्ट नेत्यांच्या संपर्कात आले. या नेत्यांच्या प्रभावामुळे अखेर १९८७ कॉम्रेड कांबळे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मेंबरशिप स्वीकारून कमुनिस्ट चळवळीत कार्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रात दलित अत्याचाराविरोधात झालेल्या आंदोलनात, इतर समाजिक राजकीय आंदोनात आणि कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोनलात सक्रिय राहिले. दलित मुक्ती शोषण मंच या अखिल भारतीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी ते काम करत आहेत. जाती अंत संघर्ष समितीच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. पक्षाच्या कामगार आणि दलित आंदोलनासह सर्व प्रकारच्या आंदोलनत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रसंगी ते जेलमध्ये सुद्धा गेले आहेत. जनआंदोलनात त्यांनी पंधरा दिवसांचा तुरुंगवास भोगला. डाव्या, आंबेडकरवादी आणि लोकशाहीवादी राजकीय आघाडी व्हावी यासाठी काम केले.
कॉम्रेड कांबळे यांनी मीरा रोड-विरार रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रवास अधिकार आंदोलन समिती'च्या वतीने केलेली आंदोलनं गाजली. रेल सत्याग्रह, रेल युथ मार्च, ऐतिहासिक रेल बहिष्कारसारखे आंदोलन केले. या समितीचे नेतृत्व कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केले. या आंदोलनाच्या परिणामी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विरार मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात आल्या, त्याशिवाय अनेक वर्षे रखडलेल्या मीरा रोड-विरार चार मार्गिकेच्या कामाने वेग घेतला.
मुंबई मधील एसआरए योजनेत अनेक बिल्डरांनी झोपडीधारकाची फसवणूक केली अशी चर्चा कायम आहे. मात्र मुंबई मधील मरोळ नाका अंधेरी येथील पहिली ४५० झोपडीधरकांची एसआरए योजना कॉम्रेड कांबळे यांनी राबवली. या योजनेत प्रामाणिकपणे काम करून लोकांना त्यांच्या हक्काचे घर दिले. तिथपासून कॉम्रेड कांबळे मुंबईतील झोपडीधारकांसाठी काम करत आहे. मुंबईतील प्रकल्पबाधित असो वा मुंबई महानगर पालिकेतील नगरी समस्यासाठी आणि धारावी पुनर्विकासासाठी कॉम्रेड कांबळे कायम मोर्चे व आंदोलन करत आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांच बालपण बीडीडी चाळीतुन सुरु झाले, मात्र त्यांच्या जीवनातील गरिबीतील संघर्ष ऐन विद्यार्थी दशेत सुरु झाला. गरिबीमुळे विद्यार्थी दशेतच कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडल्याने इयत्ता १० पर्यंत शिक्षण ही ते घेऊ शकले नाही. एकेकाळचा पवई, साकीनाका, साग बाग, चिमटपाडा, मरोळनाका या मजुरांच्या वसतिमधील कॉम्रेड शैलेंद्र यांनी आपलं आयुष्य सुरु केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असलेले कॉम्रेड शैलेंद्र यांनी मरोळनाका झोपडपट्टीत आपल्या समाजिक कार्याची सुरुवात केली. आंबेडकर, शिवजयंती, सामाजिक, राजकीय, आणि झोपडपट्टीतील नागरी प्रश्नांना घेऊन कॉम्रेड शैलेंद्र यांची सुरुवात झाली.
डेमोक्रॅटिक्ट युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सदस्य पासून ते अखिल भारतीय पदावर जाण्याचा मान त्यांनी मिळवला. एका बाजूला आंबेडकरी चळवळ आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट चळवळीतील कामाला त्यांनी गती दिली. विचारधारा पक्की असल्याकारणाने १९८७ ते १९९९ या काळात कॉम्रेड शैलेंद्र कांबळे आणि त्यांच्या पक्षाने त्यावेळी शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संघर्ष केला. प्रसंगी त्यांच्या विरोधात दोन हात केले. १९९२-९३ ची जातीय दंगलीत त्यांनी शिवसेना, भाजप, संघाच्या विरोधात संघर्ष करत जातीय धार्मिक सलोखा मजबूत होण्यासाठी काम केल. राष्ट्रीय एकात्मतेसाठी अभियान चालवले.
No comments:
Post a Comment