
मुंबई - मुंबई महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला. ७५००० करोड रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबवताना देखील कुठलीही करवाढ महापालिका प्रशासनाने सुचवलेली नाही. याबद्दल पालिका प्रशासनाचे भाजपा उपाध्यक्ष आणि माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई महापालिकेचा आज 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर रवी राजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेने हाती घेतलेला कोस्टल रोड प्रकल्प हा जवळपास पूर्ण होत आला आहे आणि त्याचा लाभ मुंबईकर घेत आहेत. त्याशिवाय गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड, लिंक रोडवरून दहिसरला जोडणारा एलिव्हेटेड रस्ता असे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. यातील काही प्रकल्पांची काम सुरु आहेत तर काही लवकरच सुरु होतील.
रवी राजा पुढे म्हणाले की, पुढील ५ वर्षांसाठी या आणि इतर प्रकल्पांसाठी २ लाख ३२ हजार करोड रुपयांच्या वर्क ऑर्डर्स दिल्या आहेत. पण यात एकच चिंतेची बाब म्हणजे, इतक्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी जो निधी लागणार आहे, तसे उत्पनाचे स्रोत मुंबई महापालिकेकडे नाहीत. महापालिका या प्रकल्पांसाठी जवळपास ४० हजार करोड रुपयांच्या एफडी वापरणार आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जर एफडी वारपल्या गेल्या आणि एखादी मोठी आपत्ती आली तर महापालिका या आपत्तीला तोंड देण्यासाठी पैसा कसा उपलब्ध करेल? याचा विचार महापालिका प्रशासकांनी करावा. अन्यथा हे बजेट हे खरंच उत्तम आणि विकासाभिमुख बजेट आहे.
No comments:
Post a Comment