मंत्री मंगलप्रभात लोढा यांची रामजन्मभूमी आंदोलनाच्या खटल्यातून अखेर सुटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2025

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची रामजन्मभूमी आंदोलनाच्या खटल्यातून अखेर सुटका


मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुरु असलेल्या ३६ वर्षे जुन्या खुटल्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान ग्रांट रोड रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनासाठी त्यांच्याविरोधात खटला सुरु होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. 

१९८९ सालच्या रामजन्मभूमी आंदोलना दरम्यान भाजपाचे सध्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे तात्कालीन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. या आंदोलना दरम्यान लोढा यांच्या नेतृत्वाखाली ग्रांट रोड स्थानकावर रेल रोको आंदोलन झाले होते. तब्बल ३६ वर्षे हा खटला सुरू राहिला. रामजन्मभूमी आंदोलनात हिंदूंच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आणि रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर अनेक भागांत विविध ठिकाणी वेगवेगळे खटले दाखल झाले होते. त्यातील हा एक खटला होता. 
याप्रकरणी गिरगाव न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. निमसे यांनी यासंदर्भातील निकाल देत लोढा यांना दिलासा दिला. मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या सोबत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही गैरकृत्य केले नव्हते आणि त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. 

न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ज्या भावनेतून हे आंदोलन करण्यात आले होते, त्या भावनांना आज केवळ देशच नव्हे, तर न्यायालयेही मान्यता देत आहेत. त्या काळात काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दाखल केलेले खोटे खटले अखेरीस दीर्घ प्रतीक्षेनंतर एक-एक करून संपुष्टात येत आहेत. हा निर्णय केवळ सत्याचा विजय नाही, तर प्रभू श्रीराम यांच्यावरील अढळ श्रद्धा आणि न्याय व्यवस्थेवरील दृढ विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad