
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केल्याने आंबेडकरी जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांच्यावर स्वतःच कारवाई करण्याचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान -
अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव पुढं वापरतो. तो भीमराव प्रचंड अभ्यास केल्याने वेदांमध्ये म्हटल्या प्रमाणे आपल्या अभ्यासाने ब्राह्मण ठरतो, असे वक्तव्य राहुल सोलापूर यांनी केले आहे.
आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र संताप -
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे. तर राहुल सोलापूर यांनी परत एकदा राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त शब्द वापरले आहेत. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी. अन्यथा राहुल सोलापूर याला घरातून बाहेर काढून चोप देऊ असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
तोंड फोडणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस -
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी जी वाक्य उच्चारली आहे, अशा राहुल सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथे तुडवा, पायातल्या चप्पलेने त्याचे तोंड फोडा त्याचे तोंड रंगवा’, हे आव्हान पूर्ण करेल त्याला एक लाखांचे बक्षीस देणार असे थेट आव्हानच ठाकरे गटातील शरद कोळी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान -
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून लाच देऊन निसटले होते. त्यांनी मिठाईच्या पेटाऱ्याचा वापर केला नव्हता. महाराजांनी लाच दिल्याचे पुरावे असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यात संतापाची लाट उसळली. विविध संघटनांसह राजकीय पक्षांनीदेखील तीव्र आंदोलन केले. समाजातील वाढता रोष पाहता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
No comments:
Post a Comment