मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील दलालांना हटवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2025

मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील दलालांना हटवा



मुंबई - मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या दलालांनी प्रशासनात मोठे अडथळे निर्माण केले असून आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील या दलालांवर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले असून मंत्रालय ‘दलालमुक्ती’ करण्याच्या प्रयोगाची तारीफ केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी सुशासन आणि सरकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दलालमुक्त मिशनला पाठिंबा दर्शवला आहे. ‘या अत्यावश्यक उपक्रमाचा उद्देश मंत्री, अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यातील वर्षानुवर्षांचे भ्रष्ट संबंध संपुष्टात आणण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे, जो मोठ्या सार्वजनिक हितासाठीचा आहे,’ असे समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.

आमदार रईस शेख यांनी निदर्शनास आणून दिले की, नोकरशहा किंवा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून अनेक वर्षे दलाली करणारे दलाल सुशासनाच्या प्रयत्नातील अडथळा आहेत. 'सचिवांच्या एका वर्गाने बेकायदेशीरपणे खाजगी व्यक्तींची यासाठी नियुक्ती केली आहे, जे त्यांच्या कार्यालयात नियमितपणे कार्यरत आहेत. या खाजगी व्यक्ती केवळ बैठकांना उपस्थित राहतात, विभागाचा आढावा घेतात असे नाही तर विभागातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन बाबींवर सूचना देखील देतात,' असे आमदार शेख यांनी सांगितले.

मंत्रालयातील ही दलाल मंडळी सचिवांच्या वतीने संबंधित विकासक किंवा प्रकल्प प्रस्तावकांशी संपर्क साधण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी म्हणून ओळखले जातात. विभागांच्या दैनंदिन व्यवहारातील या दलाल मंडळीचा बेकायदेशीर सहभाग राज्याच्या प्रशासनासाठी अत्यंत चुकीचा पायंडा पडत आहे जे यापूर्वी कधीही ऐकले नव्हते, असे आमदार शेख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. "मंत्रालयातील दलालांचा प्रश्न नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. दलालांना त्वरीत हटवले पाहिजे. राज्याचे प्रशासन हे कुप्रशासन होण्यापासून वाचवले पाहिजे, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad