
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेपासून सर्वांचे लक्ष हे या बजेटकडे लागले होते. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोट्यवधी करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिला आहे. परंतू, ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणा-यांना लागू होणार असल्याने सदर घोषणेत अटी व शर्ती लागू असे म्हटले जात आहे. जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.
नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरविली होती. आधीपासूनच म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरील कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्याने या करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टिमच ठेवली होती. हे करदाते जुन्या प्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर येण्यासाठी सीतारामण यांनी नवीन खेळी खेळली आहे. यामुळे आता ब-याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणताही सूट देण्यात आलेली नाही. त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २,५०,००० रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य आयकर भरावा लागणार आहे. तर २,५०,००१ ते ५,००,००० रुपयांदरम्यान – ५% टक्के, ५,००,००१ ते १०,००,००० उत्पन्न असलेल्यांना २०% व १०,००,००० पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ३०% कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आता कर दात्यांना स्विच व्हावे लागणार आहे.
नवा स्लॅब?
० ते ४ लाखांपर्यंत – काहीही कर नाही
४ लाख ते ८ लाखांपर्यंत – ५ टक्के
८ लाख ते १२ लाख – १० टक्के
१२ लाख ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० लाख ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखांच्या वर – ३० टक्के
No comments:
Post a Comment