मुंबई - राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
१ मार्च ‘परिवहन दिन’ या दिवसाचे औचित्य साधून सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार मजली ‘परिवहन भवन’ या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार मनिषा कायंदे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, परिवहन भवन या इमारतीसाठी चार मजल्याची परवानगी मिळाली असून पुढील परवानगीसाठी संरक्षण विभागाकडे प्रयत्न करण्यात येईल. तसेच परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विभागातील बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय. यामुळे आधीच्या गैरप्रकारांना आळा बसला. यासोबतच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 'फेसलेस सेवा' मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या असून, आजवर ४५ हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर
परिवहन विभागाच्या सेवा आणखी सहज करण्यासाठी व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सच्या माध्यमातून ५०० हून अधिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेट्रोच्या तिकीट सेवेनंतर आता या नव्या सेवांमुळे नागरिकांना कार्यालयात न जाता घरबसल्या व्हॉट्सअॅप द्वारे सुविधा मिळतील.
अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजना
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २९ टक्के आणि समृद्धी महामार्गावर ३५ टक्के अपघातांमध्ये घट झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई होत आहे, त्यामुळे शिस्तबद्ध वाहतुकीला चालना मिळत आहे.
पार्किंग समस्येवर उपाय
मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरपालिकांमध्ये पार्किंग स्पेसचे मॅपिंग करून सिंगल अॅपवर त्यांची नोंद केली जाणार आहे. नागरिकांना गाडी खरेदी करण्यापूर्वी पार्किंग सुनिश्चित करण्यासाठी भाडेतत्त्वावर पार्किंग देण्याची योजना आखली जात आहे. शासनाने आपल्या १८ हजार जुन्या गाड्यांचे स्क्रॅपिंग सुरू केले असून, त्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सन्मान निधी
धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटोरिक्षा व मीटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी महामंडळ कार्यान्वित करून त्यांना १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येत आहे, ही आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परिवहन विभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण स्वतः पाठबळ देत राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
परिवहन भवनाच्या उद्घाटनाने नवीन युगाची सुरुवात - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परिवहन भवनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या इमारतीमुळे परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितले की, योग्य जागेची निवड करून बांधण्यात आलेली ही इमारत विभागाच्या गतिशील कार्यपद्धतीला अधिक गती देईल. वेगवान निर्णय प्रक्रियेमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील. तसेच, अपघात कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असून, पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच सरकार पार्किंग धोरण आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून, त्याअंतर्गत लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. शासन परिवहन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, नागरिकांसाठी अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
चार मजली आणि १२ हजार ८०० चौरस मीटर बांधकाम असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक सुविधांसह भूमिगत पार्किंगची व्यवस्था असेल. पुढील अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी विभागाच्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, राज्याच्या महसुलात मोठा वाटा असलेल्या परिवहन विभागाला तब्बल ८५ वर्षांनंतर स्वतःचे मुख्यालय मिळणार आहे. विभाग दरवर्षी ५ व्या क्रमांकाचे उत्पन्न देतो, मात्र आजवर भाड्याच्या इमारतीत कार्यरत होता. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत स्वतःच्या इमारतीसाठी संकल्प मांडला आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, ही इमारत विभागाच्या कामकाजाला अधिक गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा - मुख्यमंत्री
Share This
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment