मुंबई - देवनार डंम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी आता काढण्यात आलेली निविदेची किंमत ही २३६८ कोटी मोठी आहे की, पुर्वी काढण्यात आलेली ४५०० कोटींची निविदा मोठी आहे, असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आणि मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केला आहे
देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आहे त्यावरुन उबाठाकडून टीका करण्यात येत आहे त्याला ॲड आशिष शेलार यांनी उत्तर दिले असून आमदार आदित्य ठाकरे आणि उबाठावर जोरदार टीका केली आहे.
ॲड आशिष शेलार यांनी आपल्या एक्स वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, टेंडर निघताच कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरुन या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहे. हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन, आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत.
1) सन. २००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली त्याची किंमत ४,५०० कोटी होती.
2) आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.
3) आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता, या कंत्राटामध्ये अनेक उणीवा आहेत हे आम्ही दाखवले होते. हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती.
4) पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राउंडची निविदा मंजूर केली. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही.
5) कचऱ्याचे ढिगारे देवनारमध्ये आजही कायम आहेत, दुर्गंधीने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. दमा, फुफ्फुसाच्या आजारांनी मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत.
6) देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करा अन्यथा एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा असे सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उबाठाने काहीच केले नाही.
7) ४,५०० कोटीचे कंत्राट दिले त्याचा हिशेब कोण देणार? आता हेच पालिका कचरा उचलण्याची निविदा काढली तरी ओरडणार..मुंबईकर हो समजून घ्या...ज्यांनी ज्या कामासाठी ४,५०० कोटीची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २,३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत.मग त्यांनी देऊ केलेले ४,५०० कोटी मोठे की, आजचे २,३६८ कोटी ?
ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंच ही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल, अपात्र झोपडपट्टी वासीयांना ही घर मिळणार, मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का? असा सवालही ॲड आशिष शेलार यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment