
मुंबई - नालेसफाईत हयगय, दिरंगाई आणि चोरी कदापी सहन केली जाणार नाही. नालेसफाईदरम्यान हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारासह अभियंत्यांवरही कारवाई करा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. नालेसफाई कामात ए आय चा वापर करणारी मुंबई पहिली पालिका असल्याचे गौरवउद्गार शिंदे यांनी काढले.
मुंबई पालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाई कामाची तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची पाहणी आज उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार राहुल शेवाळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून 85 ते 87 टक्के तर लहान नाल्यांमधून 65 टक्के सफाई करण्यात आली. उर्वरित कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नालेसफाई कामात दोषी कंत्राटदाराला 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून 4.50 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. नालेसफाई दोषी कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अभियंत्यावरही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, पालिकेने यंदा नालेसफाईच्या कामात ए आयचा वापर केला आहे. नालेसफाईच्या कामात ए आयचा वापर करणारी मुंबई पहिली महापालिका आहे. गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून पालिका आणि रेल्वेला एकत्र काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यंदा पाणी उपसा करण्यासाठी 422 पंप आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. पाणी साचणार नाही याचे प्रयत्न करा, धोकदायक दरडी कोसळतात अशा ठिकाणी पालिका आणि एमएमआरडीने संरक्षण जाळ्या लावाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या नाल्यांची केली पाहणी -
१) उषा नगर / उषा कॉम्पलेक्स नाला (एस वार्ड) २) सूर्या नगर दरड प्रवण क्षेत्र, विक्रोळी (एस वार्ड) ३) नेहरु नगर नाला वसंतदादा कॉलेज जवळ (एल वार्ड) ४) रावळी नाला, वडाळा आर.टी.ओ. जवळ (एफ/नॉर्थ वार्ड) ५) आश्रय योजना रावळी कॅम्प, सायन-कोळीवाडा (एस.डब्ल्यू.एम. विभाग) (एफ/नॉर्थ वार्ड) ६) दादर धारावी नाला, टी जंक्शन जवळ (जी नॉर्थ वार्ड) ७) आश्रय योजना माहीम कॅम्प (एस.डब्ल्यू. एम. विभाग) सोनावाला अग्यारी रोड, माहीम (जी नॉर्थ वार्ड)

No comments:
Post a Comment