लोकलमधील लटकणारे प्रवासी एकमेकांवर धडकले; ४ ठार,९ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2025

लोकलमधील लटकणारे प्रवासी एकमेकांवर धडकले; ४ ठार,९ जण जखमी


ठाणे / मुंबई - मुंबईकरांची ‘लाईफलाइन’ म्हणून ओळखली जाणारी उपनगरी लोकल प्रवाशांची डेथ लाइन ठरली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकणारे प्रवासी एकमेकाला घासले गेल्याने १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले, त्यात ४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर कळवा आणि ठाणे येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन लोकलने प्रवास करतात. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलमधून पडून ४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. कसाराहून ७.२२ वाजता सीएसएमटीकडे येणारी लोकल नऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान पोहोचली. या लोकलला दिवा थांबा असल्याने या लोकलला प्रचंड गर्दी झाली होती. लोकल दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करत होते. दिवा-मुंब्रादरम्यान रेल्वेमार्गाला असलेले वळण आणि लोकलचा वेग यामुळे दरवाजावर लटकत असलेले प्रवासी एकमेकांवर धडकून काही प्रवासी खाली पडल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर रेल्वे रूळांवर पडलेल्या प्रवाशांना तातडीने कळवा आणि ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेचा मध्य रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासाअंती घटनेचे कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार जखमींना मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाकडून अंदाजांची पतंगबाजी
मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान रेल्वे प्रवासी लोकलमधून पडल्यानंतर त्याचे ठोस कारण मध्य रेल्वेला उशिरापर्यंत सांगता आले नाही. मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान असलेले वळण, गाडीचा वेग यामुळे घटना झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. तसेच एका प्रवाशाला उलटीचा त्रास झाला, लोकलमधील प्रवाशांमध्ये भांडण झाले. काही प्रवाशांनी रिल्स बनवण्याचा प्रयत्न केला, अशा कारणांची पतंगबाजी रेल्वे प्रशासनाने केली.

प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी करणार चौकशी
मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी सी.के. प्रसाद हे मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेची स्वत: चौकशी करणार आहेत. सी.के. प्रसाद यांनी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. “भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी घटनेच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. यादृष्टीने संबंधित माहिती प्रसाद यांनी गोळा केली आहे. प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आता स्वत: या घटनेची चौकशी करतील,” असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.

ही दुर्घटना देशाचे वास्तव दाखवते - राहुल गांधी
जेव्हा मोदी सरकार ११ वर्षांच्या सेवेचा उत्सव साजरा करत आहे, तेव्हा देशाचे वास्तव मुंबईत रेल्वेतून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या या दु:खद बातमीतून दिसून येते. भारतीय रेल्वे ही कोट्यवधी लोकांचा आधार आहे, मात्र आज ती असुरक्षितता, गर्दी आणि गैरव्यवस्थेचे प्रतीक बनले आहे. मोदी सरकारची ११ वर्ष म्हणजे जबाबदारी न स्वीकारणे, परिवर्तनाचा अभाव, फक्त प्रचार, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून ५ लाख रुपये जाहीर केले आहेत. तसेच जखमींना ५० हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनातर्फे केला जाईल. याशिवाय ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन गंभीर रुग्णांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मृत प्रवाशांची नावे : केतन सरोज (२३, रा. उल्हासनगर), राहुल संतोष गुप्ता, विकी बाबासाहेब मुख्याद (३४, रा. रेल्वे पोलीस), मयुर शहा

जखमी व्यक्तींची नावे - 
-शिवा गवळी (वय २३) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

-आदेश भोईर (वय २६) हे कसारा येथे राहणारे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-रिहान शेख (वय २६) हे भिवंडी येथे राहणारे असून ते कल्याण ते ठाणे असा प्रवास करत होते. या घटनेत ते जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-अनिल मोरे (वय ४०) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

-तुषार भगत (वय २२) हे टिटवाळा ते ठाणे असा प्रवास करत होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-मनीष सरोज (वय २६) हे दिवा येथे राहणारे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-मच्छिंद्र गोतारणे (वय ३९) हे वाशिंद येथे राहणारे आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-स्नेहा धोंडे (वय २१) या टिटवाळा येथे राहत असून टिटवाळा ते ठाणे असा प्रवास करत होत्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

-प्रियंका भाटिया (वय २६) या शहाड येथे राहणाऱ्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS