शहरी भागात ५ तरुणांमध्ये १ बेरोजगार, बेरोजगारी ७.१ टक्क्यांपर्यंत वाढली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शहरी भागात ५ तरुणांमध्ये १ बेरोजगार, बेरोजगारी ७.१ टक्क्यांपर्यंत वाढली

Share This

नवी दिल्ली - जून २०२५ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. ग्रामीण भागात बेरोजगारी ४.९ टक्क्यांपर्यंत कमी झाली तर शहरी भागात ती ७.१ टक्क्यांपर्यंत वाढली. तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगारी ही चिंतेची बाब बनली आहे. पुरुष-महिला दर समान आहे, परंतु शहरी महिलांमध्ये बेरोजगारी जास्त आहे. कामगार दलातील सहभागदेखील कमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरांमधील प्रत्येक पाचवा तरुण बेरोजगार आहे. हे आकडे तरुणांना नोकरी मिळवणे किती कठीण होत चालले आहे हे सांगत आहेत.

जून २०२५ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. हा आकडा मे महिन्याइतकाच आहे. देशाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ताज्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली. ग्रामीण भागात बेरोजगारी थोडी कमी झाली असली तरी शहरी भागात ती वाढली. तरुणांमध्ये बेरोजगारीचा आकडा विशेषत: चिंताजनक आहे.

पीएलएफएसच्या अहवालानुसार ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर मे महिन्यात ५.१ टक्क्यांवरून जूनमध्ये ४.९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. परंतु शहरी भागात उलट घडले. तिथे बेरोजगारी ६.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच शहरांमध्ये नोकरी शोधणा-या लोकांना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागात शेती आणि मनरेगासारख्या रोजगार योजनांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु शहरांमध्ये औपचारिक नोक-यांचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.

जून २०२५ मध्ये पुरुष आणि महिला दोघांचा बेरोजगारी दर ५.६ टक्के होता. म्हणजेच या प्रकरणात कोणताही लिंग फरक नव्हता. परंतु जर आपण खोलवर गेलो तर शहरी आणि ग्रामीण भागातील फरक स्पष्टपणे दिसून येतो. शहरांमध्ये महिलांचा बेरोजगारीचा दर पुरुषांपेक्षा जास्त होता तर ग्रामीण भागात तो उलट आहे. हा फरक सामाजिक आणि आर्थिक घटकांमुळे असू शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बेरोजगारीचे प्रमाण वाढले - 
१५ ते २९ वयोगटातील तरुणांबद्दल बोललो तर बेरोजगारीची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. ग्रामीण भागात या वयोगटातील बेरोजगारी मे महिन्यात १३.७ टक्क्यांवरून जूनमध्ये १३.८ टक्क्यांपर्यंत वाढली. त्याचवेळी शहरी भागात ही संख्या आणखी भयावह आहे. मे महिन्यात ती १७.९ टक्के होती, जी जूनमध्ये १८.८ टक्क्यांपर्यंत वाढली. त्यामुळे शहरांतील बेरोजगारीचा वाढता दर चिंता वाढविणारा आहे.

कामगार दल सहभाग दरात घट - 
जून २०२५ मध्ये कामगार दल सहभाग दर म्हणजेच जे लोक काम करत आहेत किंवा नोकरी शोधत आहेत, त्यात किंचित घट झाली. मे महिन्यात तो ४१.४ टक्के होता, जो जूनमध्ये ४१ टक्क्यांपर्यंत खाली आला. ग्रामीण भागात एलएफपीआर ५६.०९ टक्के होता तर शहरी भागात तो ५०.४ टक्के होता. पुरुषांमध्ये ग्रामीण भागात एलएफपीआर ७८.१ टक्के आणि शहरी भागात तो ७५ टक्के होता. महिलांचा विचार केल्यास ग्रामीण भागात तो ३५.०२ टक्के आणि शहरी भागात २५.०२ टक्के होता. म्हणजेच महिला विशेषत: शहरी भागात कमी संख्येने नोक-या शोधत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages