अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर

Share This


नवी मुंबई - अशोक सराफ ही महाराष्ट्राची शान व कला क्षेत्राचा कोहीनूर आहे. अभिनयाचे चालते बोलते विद्यापिठ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. आपण अक्षरे वाचतो पण ती पाहणेही आनंददायी असते हे अच्युत पालव यांनी दाखवून दिले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्यावतीने ऐरोलीत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोक सराफ व अच्युत पालव यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता आला. जय जय महाराष्ट्र माझाला महाराष्ट्र गीताचा दर्जा देता आला. मराठी भाषा व कलेसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देताना सत्कार करता आला व आता पद्मश्री दिल्यानंतरही सत्कार होत आहे. त्यांच्याकडून अभिनय सेवा घडत जावो व पद्मभुषण, पद्मविभुषण सारखे पुरस्कारही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षरांची श्रीमंती दाखवून दिली. नवी मुंबईत कलादालन असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरच कलादालन तयार करण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

सत्कार सोहळ्याचे आयोजक व नाट्य परिषदेचे नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही सत्कार मुर्तींनी यावेळी सन्मानासाठी ऋण व्यक्त केले. अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोवीड काळात कलाकारांना केलेल्या मदतीचा उजाळा दिला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, अभिनेत्री निवेदीता सराफ, अजीत भुरे, ममीत चौगुले, अनिकेत म्हात्रे, रामअशीष यादव, विजय माने, सरोज पाटील, रोहीदास पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages