लेझिम, फुगडी, लगोरी, विटी दांडूसह पारंपरिक खेळांना पूनर्वैभव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लेझिम, फुगडी, लगोरी, विटी दांडूसह पारंपरिक खेळांना पूनर्वैभव

Share This

मुंबई - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात, मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान आपला देश विसरू शकत नाही. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहितीही लोढा यांनी दिली.

पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडी, खो-खो, लगोरी, लेझीम, रस्सीखेच,मल्लखांब, पावनखिंड दौड, कुस्ती,पंजा लढवणे, विटी-दांडू,दोरीच्या उड्या, फुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तसेच विविध शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला इथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात ही जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages