मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार

Share This

मुंबई - पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे कुर्ला येथील जामसाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, क्रीडा भारतीचे कोषाध्यक्ष गणेशजी देवरुखकर, मुंबई अध्यक्ष मिलिंद डांगे आणि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव उपस्थित होते.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाची मराठमोळे ढोल आणि लेझिमच्या तालावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले की, आजच्या यांत्रिक युगात मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना तन-मनाने सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचे पुनरुज्जीवन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात येत आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे तसेच विभागाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदाने उपलब्ध करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विभागाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ऑलिंपिक पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत. हाच धागा पकडून क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात योग दिवस सुरू करून देशी प्रकार जगभरात पोहोचवला. पारंपरिक देशी खेळांना त्यांनी विशेष महत्व दिले आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभात त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणाही कोकाटे यांनी यावेळी केली.  मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी लाठीकाठी, मल्लखांब आणि तलवारबाजी य साहसी खेळांच्या प्रात्यक्षिक ही सादर करण्यात आले. 
 
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी या पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित केल्याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच तरुणांना देशी खेळांकडे आकर्षित करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २२ ऑगस्टपर्यंत क्रीडा महाकुंभ चालणार असून २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांच्या माध्यमाने मैदान गाजवणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages