राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करणार - क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करणार - क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे

Share This

मुंबई - राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करून खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा, साधन-सामग्री उपलब्धेसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सुतोवाच राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. 

क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात समिती कक्षात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांतील क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान कटफळ ता. बारामती येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. राज्यात अद्ययावत आणि अनुरूप क्रीडा सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रीडाविषयक विविध बाबींचा सखोल अभ्यास करून नवीन क्रीडा धोरण तयार करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीस क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली - उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages