
मुंबई - एखादा आजार बरा करणाऱ्या प्रत्येकालाच आपण डॉक्टर म्हणतो. पण सरकारने यात मोठा बदल केला आहे. कोणाला आपल्या नावापुढे डॉ. लिहायचं आणि कोणाला नाही, याचं कडक पालन होणार आहे. नव्या आदेशानुसार, आता फिजिओथेरपिस्टना (Physiotherapists) नावापुढे "डॉ." लिहिण्याची परवानगी राहणार नाही.
आरोग्य सेवा महानिर्देशालयाने याबाबत आदेश काढला आहे. आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. सुनीता शर्मा यांनी स्पष्ट केलं की, आता केवळ वैद्यकीय डॉक्टरच आपल्या नावापुढे डॉ. असं लावू शकतील. फिजिओथेरपिस्टना हा दर्जा वापरण्याची परवानगी दिल्यास रुग्ण आणि सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो व त्यामुळे चुकीचे उपचार होण्याचा धोका असतो.
महानिदेशालयाने आपल्या पत्रात नमूद केलं आहे की, फिजिओथेरपिस्ट आपल्या नावापुढे 'डॉ.' आणि मागे 'पीटी' लिहित असल्याबाबत भारतातील विविध संघटनांकडून, विशेषत: भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संघटनेकडून (IAPMR) अनेक आक्षेप नोंदवले गेले होते.
या आक्षेपांचा दाखला देत DGHS ने स्पष्ट केले की फिजिओथेरपिस्टना वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे त्यांनी 'डॉ.' हा शब्द वापरणं योग्य नाही. असं केल्याने रुग्ण आणि जनसामान्यांची दिशाभूल होऊन फसवणुकीला खतपाणी मिळू शकते.

No comments:
Post a Comment