पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा तत्काळ उपलब्‍ध करा - आरोग्य मंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2025

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा तत्काळ उपलब्‍ध करा - आरोग्य मंत्री



मुंबई - राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आरोग्य सेवा सुविधा तत्काळ उपलब्ध ठेवाव्यात, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन येथे यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व लातूर परिमंडळासह, राज्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी पूरस्थिती व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

राज्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, परिमंडळातील सर्व उपसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्यसंस्थांचा आढावा घ्यावा. आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन स्थितीत 108, 102 रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहावे. पुरामुळे आरोग्य संस्था बाधित झाली असेल तर तत्काळ दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात. पूरग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार द्यावेत. स्थलांतरित नागरिकांना आरोग्य शिबिरांमध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गाव पातळीपर्यंत सूक्ष्म नियोजन करून पिण्याच्या पाण्याची व जलस्त्रोतांची नियमित तपासणी करावी. पुरामुळे स्थलांतरित झालेल्या रुग्णांवर त्या ठिकाणी जाऊन उपचाराची व्यवस्था करावी. टीसीएल पावडर व कीटकनाशक औषध फवारणी करून पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या साथरोगावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

रुग्णांना सर्व प्रकारची सेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तास उपलब्ध राहावे तसेच पूरस्थितीच्या काळात जलजन्य आजारावर प्रतिबंध करण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. बैठकीला आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्याचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS