
मुंबई - मुंबईकरांना भविष्यात ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या गारगाई धरणाच्या कामाच्या निविदा येत्या दोन महिन्यांत काढा असे निर्देश मुंबई मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना दिले.
मुंबईत सध्या दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्यक्षात आता मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज ४६०० दशलक्ष लिटर इतकी आहे. गरगाई धरण झाल्यास ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वाढलेली पाण्याची गरज, अनेक भागात जाणवत असलेला पाण्याचा तुटवडा या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या सोबत आशिष शेलार यांनी मुख्यालयात जाऊन बैठक घेतली व प्रकल्प कामांचा आढावा घेतला.
या प्रकल्पाच्या राज्य शासनाकडून परवानग्या आल्या असून केंद्र सरकारच्या वन खात्याच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे याविषयी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी मंत्री आशिष शेलार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पासाठीच्या परवानग्या लवकर मिळाव्यात अशी विनंती ही केली.
दरम्यान, परवानगी मिळताच तातडीने दोन महिन्यात निविदा काढा असे निर्देश यावेळी मंत्री शेलार यांनी दिले.

No comments:
Post a Comment