नवी दिल्ली - कोरोनामुळे २०२१ साली होऊ न शकलेली जनगणना आता होऊ घातली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. यावेळची जनगणना ही काही बाबतींत वेगळी ठरली आहे. कारण यावेळी गोळा केल्या जाणा-या माहितीमध्ये जातीसंदर्भातील माहितीचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, पहिल्यांदाच ही माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर होणार आहे. २०२६-२७ या काळात दोन टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी देशभरातील जवळपास ३४ लाख कर्मचा-यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदा होणारी जनगणना ही देशातली पहिली डिजिटल जनगणना ठरली आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अर्थात जनगणनेची जबाबदारी असणा-या आरजीआयने प्रत्यक्ष लोकांची माहिती गोळा करणा-या कर्मचा-यांना त्यांच्याच मोबाईल फोनवर जनगणनेची माहिती गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानंतर मोबाईलमधील हा डेटा केंद्रीय सर्व्हरवर ट्रान्सफर केला जाईल. कर्मचा-यांच्या मोबाईलमध्ये खास जनगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप डाऊनलोड करून दिलं जाईल. या अॅपवर इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही माहिती जमा करता येणार आहे. अँड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही प्रणालींवर हे अॅप वापरता येईल.
जर काही कारणास्तव माहिती गोळा करणा-या कर्मचा-याने मोबाईल अॅपवर माहिती न घेता काददावर नोंदी करून घेतल्या, तर नंतर त्यांना ती सगळी माहिती यासंदर्भातील विशिष्ट अशा वेबसाईटवर अपलोड करावी लागेल. या पद्धतीमुळे आधीप्रमाणे गोळा केलेली माहिती पुन्हा एकदा स्कॅन करणे, ऑनलाईन भरणे या गोष्टी टाळता येणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रत्यक्ष माहिती घेण्याचे काम डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.
दोन टप्प्यांत होणार जनगणनेचे काम
जनगणनेचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या काळात घरांबाबतची माहिती गोळा केली जाईल. त्यात घराची अवस्था, घरातील सोयी-सुविधा आणि प्रत्येक घरानिशी असणारी मालमत्ता याबाबतच्या माहितीचा समावेश आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून त्यात प्रत्यक्ष व्यक्तींची माहिती गोळा केली जाईल. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये वगळता इतर ठिकाणी याच पद्धतीने जनगणना होईल. या राज्यांमध्ये सप्टेंबर २०२६ मध्ये जनगणनेचे काम केले जाईल.

No comments:
Post a Comment