
मुजफ्फरपूर - जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीतील मोहनपूर भाग सध्या चर्चेत आहे. हा परिसर भूमिहार आणि वैश्य समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. येथे सुमारे ५०० हिंदू कुटुंबे राहतात आणि एकही मुस्लिम कुटुंब नाही असे गावातील लोक सांगतात. परंतु अलीकडेच जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीत विशेष सुधारणा केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली तेव्हा गावकरी आश्चर्य चकित झाले.
गावातील शेकडो घरात मुस्लीम मतदारांची नावे जोडली. कुणाच्या घरात २ तर कुणाच्या घरात ८-१० नावे जोडण्यात आली आहेत. आरोग्य विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी कामेश्वर ठाकूर यांच्या कुटुंबात ६ सदस्य मतदार आहेत. परंतु यादीत त्यांच्या कुटुंबात आणखी २ मुस्लीम नावे जोडण्यात आली आहेत. त्याचप्रकारे मैथुर ठाकूर, दिलीप ठाकूर कुटुंबात ५ मतदार होते, त्यांच्या घरात आणखी ४ मुस्लीम मतदारांच्या नावांचा समावेश केला आहे. ही सामान्य चूक नाही तर मोठे षडयंत्र आहे असा आरोप कामेश्वर ठाकूर यांनी करत आमच्या कुटुंबात मुस्लीम नावे कशी जोडली हे न कळण्यासारखे आहे असे त्यांनी म्हटले.
अनेक गावात सारखाच प्रकार
गावात अन्य कुटुंबासोबतही हाच प्रकार घडला आहे. अनेक वर्ष गावात जी घरे बंद आहेत, ज्यांचे मालक गाव सोडून बाहेर राहायला गेलेत. त्यांच्या घरातही मुस्लीम मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. या प्रकारामुळे गावातील जमीन, वारसा आणि संपत्ती यांच्यावरही वाद निर्माण होऊ शकतो असा आरोप गावक-यांनी केला.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
गावक-यांनी प्रारूप मतदार यादीबाबत अधिका-यांकडे तक्रार केली आहे. अधिका-यांनी गावचा दौरा केला परंतु अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही नाही. जर मतदार यादीतील नावे काढली नाहीत, योग्य सुधारणा केली नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे. मोहनपूरा परिसर यासाठीही संवेदनशील आहे कारण २०२० च्या विधानसभा निवडणुकीत साक्रा मतदारसंघात तगडी लढत झाली होती. जेडीयू उमेदवार अशोक चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १५३७ मतांनी पराभव केला होता. त्यात अशाप्रकारे मतदार यादीतील घोळ समोर आल्याने निवडणुकीच्या निकालांवर काही बदल करायचा आहे का असा संशयही गावक-यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment