मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, मनोज जरांगेंचा हुल्लडबाजांना दम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, मनोज जरांगेंचा हुल्लडबाजांना दम

Share This

मुंबई - न्यायालयाने मंगळवारपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश दिल्यानंतर आता मनोज जरांगे यांनीही आंदोलकांना आवाहन केलं आहे. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका असं आवाहन जरांगे यांनी केलं. 

मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या क्रॉस मैदानात लावा, तिथेच झोपा असंही जरांगे म्हणाले. जर कुणी ऐकणार नाही तर त्याने गावाकडे परत जावं, कुणाच्या आदेशावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना स्थान नाही. मी शेवटचं सांगतोय, आंदोलनाला बदनाम करू नका अन्यथा सोडणार नाही असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये काही ठिकाणी हुल्लडबाजी होत आहे, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत नाही असा आरोप एका याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आला. त्यावर मंगळवारी दुपारीपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करा असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलं.

मनोज जरांगे म्हणाले की, "मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका. पण कधीही लोकांना त्रास झाला नाही, पत्रकारांना त्रास झाला नाही. त्यामुळे तुम्ही संयमाने वागा. आमच्यात कुणीतरी घुसून बदनाम केलं जात आहे."

मला पुन्हा पुन्हा बोलायला सांगू नका, सगळ्यांनी मैदानावर गाड्या लावा. आख्खी मुंबई जेवल एवढं जेवण ग्रामीण भागातून येत आहे. आपल्याला जरा त्रास झाला तर लोक आपल्या एवढे मागे आहेत. मुंबईकरांना त्रास होईल किंवा न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणे असं करू नका असं आवाहन जरांगे यांनी केलं.

काही लोकांच्या सांगण्यावरून आंदोलनात चुकीचे लोक घुसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, "कुणीतरी एकटा आहे तो लोकांना उचकावतोय, आंदोलकांना रोड अडवायला सांगतोय. अंतरवालीमध्येही त्याने हेच केलं होतं. मूक मोर्चावेळीही तेच केलं होतं. असे चाळे करू नकोस, कारण माझ्या जातीचा प्रश्न आहे. तुला नेत्याचे पाय चाटायचे आहेत, पण सावध हो."

मनोज जरांगे म्हणाले की, "मी मेलो तरी या ठिकाणाहून उठणार नाही, आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. जर तुम्हाला आरक्षण नको असेल, गोंधळ घालायचा असेल तर तुमच्या गावाकडे जा. मला माझ्या जातीला मोठं करायचं आहे, माझ्या पोरांना मोठं करायचं आहे. मला वेदना होत आहेत. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असं वागू नका."

पुढच्या काही तासांमध्ये ज्या रोडवर गाड्या आहेत त्या मैदानात नेऊन लावा. तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, मराठा समाजाला गर्व वाटेल असं काम करा असं मनोज जरांगे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages