
मुंबई - छठपूजा उत्सव सुरळीत, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पार पडावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. येत्या २७ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या छठपूजेसाठी मुंबई शहर आणि उपनगरे मिळून ६७ ठिकाणी पूजा स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पूजेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
१४८ कृत्रिम तलाव आणि स्वच्छतेची व्यवस्था -
गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित पूजा होण्यासाठी १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्या उभारण्यात आल्या आहेत.
* घाटकोपर (एन विभाग) – ४४ तलाव
* दहिसर (आर उत्तर विभाग) – २२ तलाव
* कांदिवली (आर दक्षिण विभाग) – १६ तलाव
गतवर्षी ३९ ठिकाणी सुविधा देण्यात आल्या होत्या, तर यावर्षी ती संख्या दुपटीहून अधिक वाढवण्यात आली आहे. प्रत्येक स्थळी पाण्याची उपलब्धता, निर्माल्य कलश, आणि धूम्रफवारणी याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
४०३ चेंजिंग रूम आणि तात्पुरती प्रसाधनगृहे -
उत्सवकाळात ४०३ चेंजिंग रूम उभारण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था, पोलिस बंदोबस्त, आणि स्वच्छतेची व्यवस्था केली गेली आहे. तसेच तात्पुरती प्रसाधनगृहे आणि टेबल-खुर्च्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे.
आरोग्य व सुरक्षा उपाययोजना -
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस व वाहतूक विभागाशी समन्वय साधून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी पिण्याचे पाणी, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेचे आवाहन -
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, “सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि छठपूजा शांततेत साजरी करावी. खोल समुद्रात जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीत १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.”
उप आयुक्त (परिमंडळ २) व समन्वय अधिकारी प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, अधिकारी नियमितपणे क्षेत्रभेट देऊन सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी तपासणार आहेत.

No comments:
Post a Comment