छट पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधा, मंत्री मंगलप्रभात लोढांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छट पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधा, मंत्री मंगलप्रभात लोढांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब

Share This

मुंबई - मुंबई परिसरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान छट पूजा उत्सव होणार असून निश्चित केलेल्या पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असून त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी सकाळी छट पूजा आयोजित होणाऱ्या पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत असमाधान व्यक्त केले.  

जुहू चौपाटी, वरळी जांबोरी मैदान या परिसरात मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी महापालिकेडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. जुहू चौपाटी इथे छट पूजा समित्यांच्या प्रतिनिधींनी महिलांना पूजे नंतर कपडे बदलण्यासाठी ७५ स्वतंत्र खोल्यांची मागणी केली होती. मात्र महापालिकेडून अद्याप केवळ ३० खोल्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणीही पुरेश्या सुविधा दिसून न आल्याने छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनीही यावेळी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी सुविधांबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली असून गगराणी यांनी आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनीही पूजा समितीचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना पूजा स्थळावर  सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मुंबईतल्या समुद्री किनारी आणि तलाव परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय भाविक छट पूजेचा उत्सव साजरा करतात. त्यावेळी भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात यासंदर्भात मंत्री लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार संयुक्तरित्या मुंबई महापालिका मुख्यालयात पूर्व तयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनी पूजा स्थळावर पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल,वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजे नंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. छट पूजा समितीच्या म्हणण्यानुसार एकंदर मुंबई परिसरात ६० ठिकाणी पूजेचे आयोजन होत असून त्या सर्व ठिकाणी आवश्यक प्रमाणात सुविधा देण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

त्याचबरोबर पूजा स्थळावर मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. या छट पूजा पाहणी दौऱ्यात वरिष्ठ अधिकारी तसेच छट पूजा समन्वयक  दिवाकर मिश्रा आणि जितेंद्र झा सहभागी होते. त्याचबरोबर विश्वजित चंदे आणि साक्षी सावंत हे भाजप मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages