
मुंबई - मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर (वय-८६) यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गवाणकर यांच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.
‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून लोकप्रिय करण्याचे श्रेय गवाणकर यांच्याकडे जाते. ‘महाभारता’तील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवरील भाष्य करणारे ‘वस्त्रहरण’ सारखे फार्सिकल नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘वस्त्रहरण’सारखे कालातीत नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली नाटके लिहिली.

No comments:
Post a Comment