
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. ही प्रक्रिया २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेनआयडीवरून संबंधित शाळा प्रमुखांमार्फत भरायचे आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार आणि तुरळक विषय घेणारे विद्यार्थी, तसेच ‘आयटीआय’मधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांनी आपले अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावेत.
परीक्षेचे शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत भरता येईल. शुल्क भरल्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या अर्जांची स्थिती ‘सेंड टू बोर्ड’ आणि ‘पेड’ असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अर्ज सादरीकरणानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन प्री-लिस्ट प्रमाणित करावी आणि ती १७ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करावी.
शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मधील माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. परीक्षा शुल्क फक्त आयसीआयसीआय बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्येच जमा करता येईल. अर्ज सादरीकरणासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा