एसटीच्या ‘ई-बस’साठी पास योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१० ऑक्टोबर २०२५

एसटीच्या ‘ई-बस’साठी पास योजना


मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. (Pass scheme for ST's e-bus)

सरनाईक म्हणाले की, या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणा-या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस आहे.

अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्टया परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. 

पास योजनेची प्रमुख वैशिष्टये - 
९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. (ई-शिवनेरी बससेवा वगळून)

– मासिक पास:(३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांसाठी पास दिला जाईल.

त्रैमासिक पास : (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास उपलब्ध होईल.

सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.

फरक भाडे नियम : निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS