सिडकोची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ गृहनिर्माण योजना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सिडकोची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ गृहनिर्माण योजना

Share This


नवी मुंबई - सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर 4 हजार 508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून, नागरिकांना तयार (Ready to Move) सदनिका त्वरित मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील एकूण 4,508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये EWS गटासाठी 1,115 तर LIG गटासाठी 3,393 सदनिकांचा समावेश असून, EWS गटातील लाभार्थ्यांना PMAY अंतर्गत 2.50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार सदनिकांची विक्री होणार असून, संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर सदनिकेचा ताबा तत्काळ देण्यात येईल. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता अर्ज नोंदणी सुरू होईल. दि. 21 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या पात्र नागरिकांना दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पसंतीची सदनिका निवडता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages