दुबार नाव पडताळणीसाठी येणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुबार नाव पडताळणीसाठी येणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करा

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या तयारीचा भाग म्हणून प्रारूप मतदार यादीतील दुबार नावांची पडताळणी करण्याचे काम वेगात सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिकवेळा आढळणाऱ्या नावांसमोर ‘**’ अशी खूण करण्यात आली असून, त्या नोंदींची तपासणी आता घरोघरी संपर्क करून केली जात आहे.

या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व इतर निवडणूक कर्मचारी मतदारांच्या घरी तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन मतदाराचे नाव, पत्ता, लिंग आणि छायाचित्र यांची प्राथमिक पडताळणी करत आहेत. संबंधित नोंद एकाच व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाल्यास, त्या मतदाराकडून विहित नमुन्यात अर्ज घेऊन ते कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, हे निश्चित केले जात आहे.

तथापि, काही ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य न मिळाल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे महापालिकेने सांगितले. त्यामुळे दुबार नाव पडताळणी प्रक्रियेसाठी घरी किंवा संस्थांमध्ये येणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.

या संदर्भात गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष- सचिवांना लवकरच अधिकृत पत्र जारी करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. महापालिकेने स्पष्ट केले की, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages