
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या प्रारूप यादीवरील हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ३ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली असून सर्व हरकतींची तात्काळ, काटेकोर आणि गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.
दिनांक १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. संबंधित प्रभागामध्ये मतदारांची नावे चुकीने समाविष्ट अथवा वगळली असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्वरित स्थळपाहणी करून निर्णय घ्यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले.
भायखळ्यात समीक्षा बैठक
प्रारूप यादीशी संबंधित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात बैठक घेण्यात आली. आयुक्त गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त विश्वास शंकरवार, डॉ. गजानन बेल्लाळे, तसेच दोन्ही जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी, परिमंडळ उपआयुक्त आणि नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हरकतींची काटेकोर पडताळणी करण्याचे निर्देश
अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी विभागीय सहायक आयुक्तांनी येणाऱ्या हरकती व सूचनांची स्वतः तपासणी करून पारदर्शकपणे निपटारा करावा, असे सांगितले. नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे संवेदनशीलतेने ऐकून घेण्याचे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदार सहायता केंद्रांची सुरूवात
विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार यांनी सांगितले की महानगरपालिका मुख्यालयासह २४ वॉर्ड कार्यालयांमध्ये मतदार सहायता केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहेत. संभाव्य दुबार नावे ओळखण्यासाठी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल आणि संबंधित मतदारांशी थेट संपर्क साधला जाईल.
प्रारूप यादीतील लेखनदोष, लिंग, नावातील चूक, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या प्रभागात नावे समाविष्ट झाल्यास त्यांची नोंद ‘मार्क कॉपी’मध्ये करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. अंतिम याद्या तयार करताना सर्व दुरुस्त्या अचूकपणे करण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासोबतच प्रत्येक वैध मतदार योग्य प्रभागात समाविष्ट होईल याची खात्री करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment