
मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या रोजंदारी व बहुद्देशीय कामगारांना यंदाचा दिवाळी बोनस मिळालेला नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली असून या कामगारांनी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता नायर दंत महाविद्यालय येथे “बोंबाबोंब आंदोलन” करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनने दिलेल्या माहितीप्रमाणे, सन २००९–१० पासून रोजनंदारी व बहुद्देशीय कामगारांना महापालिकेकडून दिवाळी बोनस देण्याची पद्धत आहे. मागील वर्षी ४,००० रुपयांचा सायमुह बोनस कामगारांना देण्यात आला होता. मात्र २०२३–२४ आणि २०२४–२५ या दोन वर्षांचे बोनस प्रस्ताव प्रलंबित आहेत. आरोग्य विभागाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश असूनही अद्याप तो मंजुरीसाठी पाठवला गेलेला नाही, असा युनियनचा आरोप आहे.
युनियनचे सहाय्यक चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की,
“कामगार गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेची आरोग्य सेवा प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. पण दिवाळीसारख्या सणानिमित्त बोनस न मिळाल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. प्रशासनाने यापूर्वी अनेक आश्वासने दिली, मात्र निर्णय काही झालेला नाही.”
या संदर्भात आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे तसेच बी.एम.सी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना युनियनने वारंवार निवेदन दिले असतानाही निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. युनियनने स्पष्ट केले आहे की, आंदोलन हे शांततापूर्ण असले तरी न्याय मिळेपर्यंत कामगार संघर्ष करणार. महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात प्रतिक्रिया मिळालेली नाही.

No comments:
Post a Comment