उल्हासनगरात भाजपा अंतर्गत खदखद वाढली, पाच नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उल्हासनगरात भाजपा अंतर्गत खदखद वाढली, पाच नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Share This

ठाणे - उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे पाच ज्येष्ठ आणि प्रभावी नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे उल्हासनगरातील राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांचा समावेश आहे. पाचही नगरसेवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत पक्षात जाहीर प्रवेश केला.

भाजपमध्ये वाढलेली नाराजी आणि अंतर्गत खदखद - 
नगरसेवकांनी पक्ष त्याग करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्ष 2023 पासून 30 कोटींचा आमदार निधी वापराविना पडून आहे. कार्यकर्त्यांना आणि जुन्या नगरसेवकांना योग्य मान-सन्मान मिळत नाही. पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली तरी दखल घेतली गेली नाही. सलग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले आणि उल्हासनगरातील सिंधी समाजातील प्रभावी व्यक्तिमत्व जमनू पुरसवानी, तसेच भाजपचे दीर्घकाळ जुनेजाणते कार्यकर्ते असल्याने त्यांच्या निर्गमाने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवसेनेची ताकद वाढली - 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे आणि ठाण्यात झालेल्या विकासकामांच्या पद्धतीमुळे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मते उल्हासनगरचा विकास ठाणे शहराच्या धर्तीवर व्हावा, हिंदुत्व व एनडीएत राहून काम करायचे होते म्हणूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा मार्ग स्वीकारला. शिवसेनेच्या गोटातही या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरात संघटनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीचा विचार करता अजून काही नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने शिवसेना–भाजप युती व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर घेतलेल्या भूमिकेने परिस्थिती बदलली. त्यांना बाहेरून आलेल्या नेत्यांना जास्त प्राधान्य मिळत असल्याचे वाटत होते. या निर्णयाविरोधातील नाराजी वाढत गेली आणि अखेर पाचही नगरसेवकांनी टोकाचा निर्णय घेत पक्षत्याग केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages