लग्नासाठी बनला बनावट आरपीएफ एएसआय, कल्याण स्टेशनवर फुटलं बिंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लग्नासाठी बनला बनावट आरपीएफ एएसआय, कल्याण स्टेशनवर फुटलं बिंग

Share This

कल्याण (जेपीएन न्यूज) - लहानपणापासून पोलीस होण्याचं स्वप्न पाहणारा एक तरुण प्रत्यक्षात पोलिस न बनता “बनावट आरपीएफ अधिकारी” बनला! लग्न जमत नसल्याने आणि गावकऱ्यांसमोर आपली इज्जत राखण्यासाठी त्याने आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) ची वर्दी घालून एएसआय असल्याचं भासवलं. मात्र, कल्याण रेल्वे स्थानकावर फिरत असताना त्याचा भांडाफोड झाला आणि आरपीएफ तसेच जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली.

धक्कादायक प्रकारातील आरोपीचे नाव अविनाश जाधव (रा. भूम, जि. धाराशिव) असं असून, तो शिक्षणाने एफ.वाय.बी.ए. पर्यंत शिकलेला आहे. सध्या तो कल्याण परिसरातील हॉटेलमध्ये सफाईचं काम करून उदरनिर्वाह करत होता.

आरपीएफची वर्दी, ‘एएसआय’ची फित आणि पोलिसी अंदाज - 
बुधवारी कल्याण स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. त्याच वेळी आरपीएफच्या जवानांनी एका अपरिचित अधिकाऱ्याला वर्दीत पाहिलं. कल्याण स्थानकावर तो याआधी कधी दिसला नव्हता, त्यामुळे शंका घेत जवानांनी त्याची चौकशी केली. विचारपूस सुरु होताच अविनाशची बोबडी वळली आणि पोलिसांना समजलं की तो खरा आरपीएफ अधिकारी नसून बनावट वर्दी घालून फिरत होता. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेत जीआरपीकडे सुपूर्द केलं. सध्या कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गावात सत्कार, पण सगळं होतं बनावट! - 
अविनाशने आपल्या गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं होतं की तो आरपीएफमध्ये एएसआय म्हणून कार्यरत आहे. इतकंच नाही तर गावकऱ्यांनी त्याचा “आरपीएफ जवान” म्हणून सत्कारही केला होता. मात्र सत्य समोर आल्यानंतर गावकरीही थक्क झाले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अविनाशने कोणतेही गैरकृत्य केलेले नसल्याचे समोर आले असले, तरी वर्दीचा गैरवापर आणि दिशाभूल केल्याप्रकरणी तपास सुरु आहे.

पोलीस होण्याचं अपूर्ण स्वप्न आणि सामाजिक दबाव - 
अविनाश जाधवचं बालपणापासून पोलीस होण्याचं स्वप्न होतं. मात्र, ते पूर्ण न झाल्याने आणि लग्नाचे प्रस्ताव न मिळाल्याने, त्याने हे विचित्र आणि धक्कादायक पाऊल उचलल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या मते, तो केवळ वर्दी परिधान करून स्वतःला अधिकारी म्हणून दाखवत होता; अद्याप कोणतीही फसवणूक अथवा गैरव्यवहार केल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. सध्या आरोपी कल्याण जीआरपीच्या ताब्यात असून, पुढील चौकशी सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages