
मुंबई - एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच दक्षिण मुंबईतही घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. यासंदर्भात घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते. गिरगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंगे फेरीवाले राजरोसपणे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्त भारती यांना दिली आहे.
मुंबईतल्या अनेक भागात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढत असताना, मात्र त्या तुलनेत धडक कारवाई होत नसल्याबाबत मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गिरगावमध्ये काही फेरीवाले अवैध पद्धतीने व्यवसाय करत असून ते स्थानिक नागरिकांना धमकावत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या घुसखोरांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले असून त्यावर एक सारखीच जन्मतारीख असल्याचा मुद्दाही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिला आहे. यासंदर्भात दक्षिण मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलीस आयुक्त देवेन भारती यांना देण्यात आले.
मालवणीत अनधिकृत बांधकामाची कारवाई थंडावली -
दरम्यान, मालवणी परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे आढळून आले आहेत. या अनधिकृत बांधकामाला स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा आशीर्वाद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याचीही शेख यांनी तयारी सुरू केली असल्याची माहितीही यावेळी लोढा यांनी दिली. दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील मंत्री लोढा यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment