
मुंबई - मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशी रद्द करून माफीची मागणी करणारे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे आमदार अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या घरासमोर स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्ती गीत 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन करणार असल्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
'वंदे मातरम' गीताला येत्या ७ नोव्हेंबरला १५० वर्ष पूर्ण होत असून या अनुषंगाने' सार्ध शताब्दी महोत्सव' अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये 'वंदे मातरम'चे समूह गायन होणार आहे. मंत्री लोढा यांनी शारदा मंदिर या गामदेवी इथल्या शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांसह समूह गायन करून कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात केली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मातृभूमीला वंदन करणाऱ्या 'वंदे मातरम' गीताला विरोध केल्या नंतर मंत्री लोढा यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रपतींना लिहले होते. त्याचाही उल्लेख करत लोढा यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
'वंदे मातरम' हे गीत कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर या गीताने केवळ राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, या गीताला विरोध करून आझमीं सारखे नेते राष्ट्रद्रोह करत असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. शारदा मंदिर शाळेत गीताचे समूह गायन हे 'वंदे मातरम् ' गीताला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रभक्तीच्या भावनेने आम्ही वंदे मातरम म्हणणारच, तसेच या गीताचा विरोध करणाऱ्यांच्या कार्यालयासमोर ही ' वंदे मातरम् ' चे सामूहिक गायन करू, असे आव्हान ही मंत्री लोढा यांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आमदारांना केले आहे.
दरम्यान, देशभक्तीने भारलेल्या वातावरणात मंत्री लोढा यांनी शारदा मंदिर शाळेतल्या विद्यार्थ्यांना या स्वातंत्र्यलढ्यातील स्फूर्ती गीताची महतीही सांगितली. 'वंदे मातरम् ' हे केवळ गीत नाही, तर आपल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना वंदन करून राष्ट्रप्रेमाची ज्योत या गीतामुळे सदैव तेवत राहील, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरम्' गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासकीय स्तरावर विविध शिक्षण संस्थांमध्ये या गीताच्या समूह गायनाचे आदेश दिले आहेत. या निमित्ताने मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत जागवणाऱ्या या गीताचे राज्यभरात समूह गायना सोबतच परिसंवाद, निबंध लेखन आणि व्याख्याने असा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात होणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.

No comments:
Post a Comment