
मुंबई (जेपीएन न्यूज) - आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा आणि माणुसकी हरवली आहे, अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. परंतु बोरीवली स्थानकावर घडलेल्या एका प्रसंगाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, या जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे.
२१ ऑक्टोबर २०२४ रोजी रोनक वासा हे बोरीवली स्थानकावरून प्रवास करत होते. त्यांच्या घाईगडबडीत त्यांनी ८०,००० (ऐंशी हजार रुपये) असलेली रक्कम लोकलमध्ये विसरली. त्यांना या घटनेची जाणीव होताच मनात काळजी निर्माण झाली. मात्र, आशा नव्हती की ही रक्कम परत मिळेल.
दरम्यान, जिनवेद्या मिशन नालासोपारा केंद्राचे अध्यक्ष व महानगरपालिकेतील कर्मचारी रवींद्र पवार यांना ती रक्कम बोरीवली रेल्वे स्थानकावर सापडली. त्यांनी तत्काळ ती रक्कम सुरक्षित ठेवली आणि तिचा मालक शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
शोध घेत असताना त्या पिशवीतील तपशीलांवरून पैसे यू.बी.एस. – ए.जी., शेड्युल्ड कमर्शियल बँक, कॉर्पोरेशन इन्कॉर्पोरेटेड इन स्वित्झर्लंड व्हिथ लिमिटेड लायबिलिटी, वरळी मुंबई या बँकेतील व्यवहाराशी संबंधित असल्याचे दिसून आले. पवार यांनी स्वतः जाऊन बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला आणि तपास करून रोनक वासा हेच त्या पैशांचे खरे मालक असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर रवींद्र पवार यांनी स्वतः रोनक वासा यांना संपर्क करून त्यांच्या हातात रक्कम सुपूर्द केली. या संपूर्ण व्यवहाराचे प्रमाणीकरण कांदिवली रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. वासा यांनी या प्रामाणिक कृतीबद्दल रवींद्र पवार यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांचा गौरव केला. ही घटना केवळ एक पैसे परत देण्याची नाही, तर समाजात अजूनही प्रामाणिकता, नैतिकता आणि माणुसकी जिवंत असल्याचा प्रेरणादायी दाखला आहे.

No comments:
Post a Comment