
नवी मुंबई - हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व कामगिरी करत प्रथमच महिला एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात केली. शेफाली वर्मा हिने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारताने प्रथम फलंदाजी करत २९८ धावा केल्या. शेफालीने ७८ चेंडूंत ८७ धावा झळकावत संघाचा डाव उभारला. तिच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. स्मृती मानधनाने ४५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी करत डावाला स्थैर्य दिले. जेमिमाने २४ धावा केल्या. दीप्ती शर्मा (३८) आणि रिचा घोष (३४) यांनी शेवटच्या टप्प्यात फलंदाजीत भर घालत संघाला २९८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाका आणि एमलाबा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, मात्र भारतीय फलंदाजांना थांबवण्यात त्यांना यश आलं नाही. भारताच्या गोलंदाजांनी नंतर अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला २४६ धावांवर गुंडाळले. शेफालीने दोन महत्वाच्या विकेट्स घेत आपल्या अष्टपैलू खेळीला शोभेल अशी कामगिरी केली.
या विजयासह भारतीय महिलांनी देशाला अभिमानाचा क्षण दिला असून, वर्ल्ड कपच्या इतिहासात आपलं सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलं आहे.

No comments:
Post a Comment