
मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिले आहेत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि नागरी सुविधा याबाबतचा आढावा गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रकाश सुर्वे, माजी आमदार भाई गिरकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि इतर प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गोयल यांनी वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले असून, वर्दळीच्या काळात अवजड वाहनांचे आगमन-निर्गमन बंद ठेवण्यावर भर देण्यात आला. कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना गोयल म्हणाले की, “उत्तर मुंबईत बहुतांश रस्त्यांचे काँक्रिटिकरण पूर्ण झाले असून वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने १० तलावांचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प तयार केला असून तो सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वावर राबविण्याचे नियोजन आहे.”
माहुल उदंचन केंद्राच्या जागेचा प्रश्न सुटल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, दहिसर आणि पोईसर नदीकाठी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे (STP) उभारण्याचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा नियमित आणि योग्य दाबाने राहावा यासाठी जलवाहिन्यांचे निरीक्षण व दुरुस्ती करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीत सार्वजनिक व सशुल्क प्रसाधनगृहांच्या नव्या प्रकल्पांवर चर्चा होऊन आठ ठिकाणी नवे प्रसाधनगृह उभारण्याचे ठरले. तसेच बोरिवलीतील भगवती रुग्णालय लवकरच पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवेसाठी कार्यरत होईल, अशी माहितीही गोयल यांनी दिली.

No comments:
Post a Comment