दुय्यम अभियंता पदोन्नतीतील रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घ्या, इंजिनिअर्स युनियनची पालिका आयुक्तांकडे मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुय्यम अभियंता पदोन्नतीतील रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घ्या, इंजिनिअर्स युनियनची पालिका आयुक्तांकडे मागणी

Share This

मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभागामधील पदोन्नतीची दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणे आणि शेकडो रिक्त पदांमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या बैठकीची तसेच त्वरित निर्णयाची मागणी केली आहे.

युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात पदोन्नतीच्या 50 टक्के कोट्यातील दुय्यम अभियंता (स्थापत्य) 307 पदे आणि दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) 132 पदे—एकूण 439 पदे आजही रिक्त असल्याचे निदर्शनास आणले आहे.

पदोन्नती न देता सरळसेवा भरतीची प्रक्रिया सुरू - 
निवेदनानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये महापालिकेने सरळसेवेने भरती करण्यासाठी दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233 आणि दुय्यम अभियंता (यां.वि.) 77 पदांची जाहिरात काढली. मात्र, त्याचवेळी सेवांतर्गत पात्र असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीची 50% कोट्यातील 439 पदे रिक्त असून, त्या पदांवर नियुक्त्या न घेता बाहेरील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली गेली, असा आरोप युनियनने केला आहे.

पदोन्नतीची पदे हेतूपुरस्सर रिक्त ठेवली जात आहेत - 
इंजिनिअर्स युनियनने आरोप केला आहे की, कनिष्ठ अभियंत्यांना वेळेवर पदोन्नती दिली जात नाही. अनेक वर्षे रिक्त पदे जाणीवपूर्वक न भरण्यात येत आहेत. सेवाज्येष्ठ अभियंत्यांना सरळसेवेतील उमेदवारांच्या मागे ढकलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कनिष्ठ अभियंत्यांत अन्याय झाल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे. संघटनेकडे या संदर्भातील तक्रारी सतत येत असून अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असेही निवेदनात नमूद आहे.

प्रथम पदोन्नती, नंतरच सरळसेवा नियुक्त्या - 
युनियनचे म्हणणे आहे की परंपरेनुसार आणि नियमांनुसार सरळसेवा भरतीपूर्वी पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व पदे भरणे आवश्यक आहे. सेवाज्येष्ठ कनिष्ठ अभियंत्यांची वरिष्ठता प्रथम संरक्षित करावी त्यानंतरच बाहेरील उमेदवारांची नियुक्ती करावी. मात्र या नियमानुसार कार्यवाही न झाल्याने कनिष्ठ अभियंत्यांमध्ये असंतोष वाढला आहे, असे युनियनने स्पष्ट केले.

आयुक्तांकडे तातडीच्या बैठकीची मागणी - 
युनियनने महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे की, दुय्यम अभियंता (स्थापत्य / यां.वि.) पदांतील 50% पदोन्नती कोट्यातील 439 रिक्त जागा तातडीने भराव्यात. पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता सरळसेवेच्या उमेदवारांच्या आधी निश्चित करावी. या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी संघटनेसोबत तातडीची बैठक घ्यावी.

अभियांत्रिकी विभागातील प्रकल्प, दुरुस्ती व देखभाल, तांत्रिक देखरेख यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर या रिक्त पदांचा थेट परिणाम होत असल्याने महापालिकेने तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages