
मुंबई (जेपीएन न्यूज) - कूपर रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात तीन डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने रेसिडेंट डॉक्टर, इंटर्न्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ओपीडी इमारतीसमोर निदर्शने केली. या निदर्शनांदरम्यान डॉक्टरांनी ‘ठिय्या आंदोलन’ करत सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली. सोमवारपर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला.
बीएमसी एमएआरडीचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर यांनी सभेला संबोधित करत आतापर्यंत झालेल्या चर्चेची माहिती दिली आणि पुढील कार्ययोजनेचा आढावा घेतला. डॉक्टरांवरील हिंसाचार सहन केला जाणार नाही; सुरक्षितता ही आमची मूलभूत गरज आणि अधिकार आहे. इंटर्न प्रतिनिधी म्हणून डॉ. वैभव (एएसएमआय कूपर) यांनी बोलताना डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी सामूहिक रजेवर जाण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.
या वेळी बीएमसीच्या इतर सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील वरिष्ठ एमएआरडी प्रतिनिधींनीही एकजूट दाखवली. डॉ. अमर आगमे, महासचिव, बीएमसी एमएआरडी (केईएम), डॉ. दिग्विजय जाधव, उपाध्यक्ष, बीएमसी एमएआरडी (नायर रुग्णालय), डॉ. रवी सापकळ, उपाध्यक्ष, बीएमसी एमएआरडी (सायन रुग्णालय) या तिघांनीही उपस्थितांना संबोधित करत सांगितले की, जर सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर त्यांच्या संबंधित महाविद्यालयांतील डॉक्टरही कूपर रुग्णालयासोबत ‘सामूहिक रजा’ आंदोलनाचा इशारा दिला. डॉक्टरांनी रुग्णालयातील सुरक्षेअभावी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि वारंवार घडणाऱ्या हिंसाचारामुळे गंभीर चिंता व्यक्त केली. या सर्व बाबी एमएआरडी नेतृत्वाने लक्षात घेऊन पुढील निर्णयासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
या आंदोलनामुळे मुंबईतील सर्व बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांमध्ये एकात्मतेचा आणि संतापाचा सूर उमटला आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शहरातील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
बीएमसी मार्डच्या मागण्या -
1️⃣ संस्थात्मक एफआयआर तात्काळ दाखल करावा
2️⃣ संवेदनशील विभागांमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाची (एमएसएफ) तैनाती करावी
3️⃣ उच्चाधिकाऱ्यांकडून लेखी हमी व अंमलबजावणीसह ठोस कृती आराखडा सादर करावा

No comments:
Post a Comment