मुंबई विद्यापीठातील 1 हजार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई विद्यापीठातील 1 हजार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित

Share This

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील असंवैधानिक आणि विद्यार्थीविरोधी निर्णयांमुळे सुमारे १,००० विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिल्याचे मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. एफवाय प्रवेश पोर्टल बंद करणे, पीएचडी गाईडशिपमधील विलंब आणि ६०० विद्यार्थ्यांचे पीएचडी प्रवेश रद्द करणे या निर्णयांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे.

एफवाय प्रवेश प्रक्रियेत अडथळे -
२५ ऑगस्ट २०२५ पासून मुंबई विद्यापीठाचे प्रथम वर्ष प्रवेश पोर्टल बंद करण्यात आले. राज्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टल बंद असल्याने प्रलंबित राहिले आहेत. महाराष्ट्र सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू असताना विद्यापीठाने पोर्टल अचानक बंद केल्याचे कोणतेही स्पष्ट कारण अद्याप सांगितलेले नाही.

पीएचडी गाईडशिप आणि प्रवेशांमध्ये प्रशासकीय विलंब -
गेल्या एक वर्षापासून संशोधन केंद्रांतील अनेक प्राध्यापकांच्या गाईडशिप प्रस्तावांना मंजुरी दिली गेलेली नाही. त्यामुळे पीएचडी अभ्यासक्रमासाठी पात्र (PET उत्तीर्ण) विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. जवळपास १०० प्राध्यापकांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे.

६०० पीएचडी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द -
पीएचडी अभ्यासक्रमात जागा नसल्याचे कारण देत मुंबई विद्यापीठाने सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा निर्णय विद्यार्थीविरोधी असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे मत आहे.

मनसे विद्यार्थी सेनेच्या मागण्या -
- एफवाय प्रवेश पोर्टल तातडीने सुरू करून ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत.

- प्रलंबित १०० प्राध्यापकांच्या गाईडशिप प्रस्तावांना मंजुरी द्यावी.

- PET उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशासाठीची कालमर्यादा २०२६ पर्यंत वाढवावी.

- रद्द करण्यात आलेले ६०० पीएचडी विद्यार्थ्यांचे प्रवेश पुनर्स्थापित करावेत.

आंदोलनाची चेतावणी -
मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्डे म्हणाले, “विद्यापीठाचा ढिम्म आणि निष्काळजी कारभार अनेक वर्षांपासून सुरू आहे. या धोरणांमुळे हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहेत. याची जबाबदारी शांत बसलेल्या कुलगुरूंनी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनसे विद्यार्थी सेना लवकरच तीव्र आंदोलन छेडणार आहे.”

विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास संपूर्ण जबाबदारी मुंबई विद्यापीठ प्रशासनावर राहील, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages